मृत्यूचा सापळा येलदरीच्या “त्या” पुलावरून पिकप कोसळली: तरुणाचा दुर्देवी मृत्यू

येलदरी पुलावर पिकअप कोसळली; एका युवकाचा करुण अंत
तो अरुंद पूल बनला मृत्यूचा सापळा
*तो” जर्मन टेक्नॉलॉजी केबल स्टे पूल कार्यान्वित कधी होणार
जिंतूर —जिल्ह्यातील जिंतुर तालुका येथिल पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी कँम्प येथिल धरणाजवळील अत्यंत अरुंद आणि धोकादायक पुलावरून पिकअप गाडी नदीपात्रात कोसळून झालेल्या भीषण अपघातात एका ३१ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. अंकुश रामेश्वर शिंदे (रा. शिंदे टाकळी, ता. सेनगाव) असे मृत युवकाचे नाव
आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिरंगाईचा आणखी एक बळी गेल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश शिंदे हे मंगळवारी रात्री ८ ते ९ च्या सुमारास आपल्या पिकअप गाडीने जालना येथून गावाकडे निघाले होते. येलदरी येथील अरुंद पुलावरून जात असताना पुलाला कठडे नसल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन थेट पूर्णा नदीच्या पात्रात कोसळले. सध्या धरणातून विसर्ग सुरू असल्याने नदीला मोठा प्रवाह आहे.
गाडी पाण्यात पडल्यानंतर पुलाला अडकली, मात्र पाण्याचा वेग अधिक असल्याने अंकुश यांना बाहेर पडता आले नाही. ही घटना रात्री घडल्याने कोणाच्याही लक्षात आली नाही. बुधवारी सकाळी पुलावरून ये-जा करणाऱ्यांना वाहन
दिसल्यानंतर हा अपघात उघडकीस आला.
@प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष@
मागील वर्षी येलदरी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे या जुन्या पुलाचे कठडे वाहून गेले होते. तेव्हापासून हा पूल मृत्यूचा सापळा बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने येथे वारंवार छोटे-मोठे अपघात होत आहेत.
’तो’ नवा पूल ठरतोय पांढरा हत्ती!
विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर राज्य शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून आधुनिक ‘सीलिंग’ पद्धतीचा पूल बांधला आहे. मात्र, केवळ पुलाच्या दोन्ही बाजूंचे पोहोच रस्ते (Approach Roads) पूर्ण झाले नसल्याने हा पूल मागील वर्षभरापासून वापराविना पडून आहे. नवीन पूल तयार असतानाही वाहनधारकांना जीव धोक्यात घालून जुन्या अरुंद पुलावरून कसरत करावी लागत आहे.
४ तास वाहतूक कोंडी
बुधवारी येलदरीचा आठवडी बाजार असल्याने पुलावर मोठी गर्दी असते.
पुलाच्या मध्यभागी ही घटना घडल्याने आणि बचाव कार्य सुरू असल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जिंतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मोठ्या शर्थीने मृतदेह बाहेर काढला.
नागरिकांचा सवाल: “नवा पूल तयार असूनही रस्ते का पूर्ण केले जात नाहीत? आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येईल?” असा संतप्त सवाल शिंदे टाकळी आणि येलदरी परिसरातील ग्रामस्थांनी विचारला आहे.
@चौकट@
मराठवाडा विदर्भाला जोडणारा हा येलदरी धरणावरील पूर्णा नदीवर असलेला अरुंद व कठडे नसणाऱ्या या पुलावरून यापूर्वी अनेक वाहने पूर्णा नदी पात्रात पडले असून काहींचे जीव गेले व कित्येक वाहने पडल्याने असंख्य जणांना कायमचं अपंगत्व आल्याचे समजते.
या अरुंद व मृत्यूचा सापळा असलेल्या पुलास पर्यायी पूल म्हणून जर्मन टेक्नॉलॉजीचा केबल स्टे पूल बनवून तयार झालेला आहे.
पण तो अद्यापही रहदारीसाठी मोकळा केलेला नाही. सदरील नवीन पूल लवकरात लवकर रहदारीसाठी मोकळा करण्यात यावा व जिंतूर येलदरी रस्त्याच्याचे कामही पूर्णत्वाकडे न्यावे अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.




