अखेर परभणी एलसीबीचा सापळा यशस्वी:घरफोडी चोरीतील अट्टल गुन्हेगार जेरबंद

परभणीत एलसीबीचा सापळा यशस्वी; घरफोडी-चोरीतील अट्टल गुन्हेगार अखेर जेरबंद
सोनपेठ, परभणी ग्रामीणसह विविध ठाण्यांतील गुन्ह्यांचा उलगडा; आरोपींपैकी एकावर मोका कायद्याखाली गुन्हा
जिंतूर : जिल्ह्यातील फरार व पाहिजे असलेल्या आरोपींच्या शोधासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत परभणी स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींपैकी एकावर यापूर्वी मोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण) कायद्यांतर्गत गुन्हा नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेला लोखंडी खंजर जप्त केला आहे.
पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या आदेशानुसार आणि अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने फरार आरोपींच्या शोधासाठी विशेष मोहीम सुरू केली होती. पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथक गंगाखेड परिसरात शोधमोहीम राबवत असताना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शेष्या उर्फ शेषेराव चपऱ्या काळे (वय ३८, रा. मोहळ, जि. सोलापूर) हा खळी फाटा परिसरात थांबलेला आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून शेष्या काळे याला ताब्यात घेतले. त्याच्यासोबत असलेला आलीश उर्फ आल्या उर्फ काळया सुरेश काळे (रा. दत्तनगर, मोहळ, जि. सोलापूर) यालाही पोलिसांनी पकडले.
दोन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेत आणून कसून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांनी परभणी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडी व चोरीचे अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपी क्रमांक एक शेष्या काळे याची झडती घेतली असता त्याच्या कंबरेला लपवून ठेवलेला लोखंडी खंजर आढळून आला. हा खंजर पंचासमक्ष जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान आरोपींनी सोनपेठ, परभणी ग्रामीण, जिंतूर, दैठणा आणि गंगाखेड या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडीचे गुन्हे केल्याचे समोर आले. या गुन्ह्यांमधून पोलिसांनी १ लाख ८ हजार ९५० रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच इतर मुद्देमाल जप्त केला आहे. काही दागिने विक्री केल्याची कबुली आरोपींनी दिली असून त्यासंदर्भात पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, पोलीस उपनिरीक्षक चंद्रसिंह परिहार तसेच पोलीस कर्मचारी महेश कवठाळे, राहुल परसोडे, सिद्धेश्वर चाटे, माणिक वाघ, केशव लटपटे, सचिन भदर्गे, रंगनाथ दुधाटे, नामदेव डुबे, राम पोळ, दिलीप निलपत्रेवार, गजानन क्षीरसागर, उमेश चव्हाण, मधुकर ढवळे, शरद सावंत, साने, उत्तम हनवते आणि कांगणे यांनी सहभाग घेतला. या कारवाईमुळे जिल्ह्यातील घरफोडीच्या अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला असून आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी संबंधित पोलीस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.



