जिंतूर बस स्थानकात शितल जल केंद्र सुरू:: प्रवाश्यांना दिलासा

जिंतूर बस स्थानकात ‘शितलजल केंद्र’ सुरू; प्रवाशांसाठी दिलासा
तोष्णीवाल चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम
जिंतूर : शहरातील बस स्थानक परिसरात स्व. अयोध्याबाई रामनारायणजी तोष्णीवाल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेल्या ‘शितलजल केंद्रा’चे उद्घाटन उत्साहात पार पडले. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणारा हा उपक्रम सर्व स्तरांतून कौतुकास पात्र ठरत आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संदीपभाई शर्मा महाराज होते, तर उद्घाटन नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गटनेते सचिन गोरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव शिंदे, उपनगराध्यक्ष टीका खान पठाण , नगरसेवक गोपाळराव रोकडे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डॉ. पंडित दराडे, ज्येष्ठ विधिज्ञ मनोज सारडा, वाहतूक अधीक्षक सोनवणे, वाहतूक निरीक्षक संदीप भांबळे, पत्रकार विजय चोरडिया, शेख शकील, राजाभाऊ नगरकर आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ट्रस्टच्या वतीने प्रास्ताविक करताना तोष्णीवाल यांनी या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. गेल्या अनेक वर्षांपासून ट्रस्ट समाजोपयोगी उपक्रम राबवत असून, प्रवाशांच्या सोयीसाठी बस स्थानकात शितलजल केंद्र गेल्या पंधरा वर्षापासून सुरू असून ट्रस्टच्या माध्यमातून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर अपंगासाठी साहित्य वाटप असे विविध कार्यक्रम घेतल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणाऱ्या प्रवाशांना या केंद्रामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपल्या भाषणातून या उपक्रमाचे कौतुक केले. समाजसेवेच्या भावनेतून उभारण्यात आलेले हे शितलजल केंद्र समाजासाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत व्यक्त करण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या सुविधा निर्माण होणे ही काळाची गरज असून, नागरिकांनीही या उपक्रमाच्या माध्यमातून पाण्याची जपणूक करावी, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमावेळी चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य रमण तोष्णीवाल, नगरसेवक दत्ता कटारे, नागेश आकात, पुरुषोत्तम पोरवाल, सुनील तोष्णीवाल, मंचक देशमुख, निहाल अहमद, भागवत चव्हाण, रामप्रसाद कंठाळे, मनोहर कदम, गजानन तिखे यांच्यासह शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद पाचपिले तर आभार प्रदर्शन सुभाष चोपडे यांनी केले. उपक्रमामुळे बस स्थानकावर येणाऱ्या हजारो प्रवाशांना थंड पाण्याची सुविधा उपलब्ध होणार असून, समाजसेवेचा हा आदर्श उपक्रम ठरणार आहे.


