महामार्ग बांधकाम प्रशासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रवाशी निवारा केला जमीनदोस्त:आंबेडकरी अनुयायी संतापले

इंजिनियरने डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवासी निवारा केला जमीनदोस्त;
@आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या
@आंबेडकरी अनुयायी आंदोलनाच्या तयारीत
जिंतूर::शहरातील जालना मार्गावरील बकसा फाटा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभारण्यात आलेला प्रवासी निवारा पाडण्यात आल्याच्या घटनेमुळे आंबेडकरी अनुयायी व नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. संबंधित यंत्रणा व इंजिनियरने कोणतीही पूर्वसूचना न देता तसेच नगरपालिका आणि पोलिस प्रशासनाची आवश्यक परवानगी न घेता हा प्रवासी निवारा जमीनदोस्त केल्याचा आरोप होत आहे. या प्रकारामुळे आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेला हा प्रवासी निवारा अनेक वर्षांपासून प्रवाशांसाठी आधार ठरत होता. उन्हाळा, पावसाळा तसेच विविध ऋतूंमध्ये नागरिक या निवाऱ्याचा वापर करत होते. मात्र अचानकपणे हा निवारा पाडण्यात आल्याने परिसरातील नागरिक व दलीत सामाजिक कार्यकृत्ये आश्चर्यचकित पेटून उठले आहेत.
निवारा पाडण्यापूर्वी संबंधित विभागाने नगरपालिका प्रशासनाची मंजुरी घेतली होती का, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिस प्रशासनाला माहिती देण्यात आली होती का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
चौकट
संबंधित विभागाची हुकुमशाही
मां.नगरसेवक चंद्रकांत बहिरट
सार्वजनिक मालमत्ता अथवा समाजपुरुषांच्या नावाने उभारलेल्या वास्तूंवर कारवाई करताना नियमानुसार प्रक्रिया राबविणे आवश्यक असते. मात्र या प्रकरणात नियमांचे पालन झाले नसल्याचा आरोप होत आहे.
आंबेडकरी संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाच्या संविधानाचे शिल्पकार असून त्यांच्या नावाशी निगडित असलेल्या वास्तूचे पाडकाम करताना प्रशासनाने संवेदनशीलता दाखवणे आवश्यक होते, असे मत मा.नगरसेवक चंद्रकांत बहिरट यांनी व्यक्त करत आपला रोष व्यक्त केला असून आज सोमवारी या बाबत पोलिस स्टेशन,नगर परिषद प्रशासन व सार्वजनिक बांधकाम यांना निवेदन सादर करून संबंधित यंत्रणेवर गुन्हे दाखल करून चौकशीची मागणी करणार आहेत. व डॉ.बाबासाहेब आंबेडकर नावाने प्रवासी निवारा तत्काळ उभा
करन्याची मागणीही केली जाणार असल्याची माहिती चंद्रकांत बहिरट यांनी सागितले.




