गरजू व पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहणार नाही:: तालुका कृषी अधिकारी घुगे

गरजू व पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहणार नाही…कृषी अधिकारी घुगे
@कृषी कार्यालयात शेतकऱ्यांच्या शंका निरसनासाठी ‘कृषी सेवक’ तैनात;
@तक्रारींची दखल घेत नवा निर्णय
जिंतूर :तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीविषयक अडीअडचणी, शंका आणि तांत्रिक मार्गदर्शनासाठी आता भटकंती करावी लागणार नाही. शेतकऱ्यांच्या समस्यांचे जागेवरच निराकरण करण्यासाठी जिंतूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने एक विशेष पाऊल उचलले असून, दररोज कार्यालयात कृषी सेवकांची नियुक्ती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. याबाबतचे अधिकृत आदेश तालुका कृषी अधिकारी एन.जी. घुगे यांनी निर्गमित केले आहेत.
तालुक्यातील अनेक शेतकरी मार्गदर्शनासाठी तालुका कार्यालयात चकरा मारतात, मात्र अनेकदा क्षेत्रीय कर्मचारी किंवा अधिकारी गावात दौऱ्यावर असल्याने त्यांची भेट होत नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन होण्यास अडचणी येत होत्या.या बाबीची गंभीर दखल घेत तालुका कृषी कार्यालयाने आता महिनाभराचे नियोजन जाहीर केले आहे.
नवीन आदेशानुसार, दर महिन्याच्या १ ते ३१ तारखेपर्यंत प्रत्येक दिवसासाठी स्वतंत्र कृषी सेवकाची ड्युटी लावण्यात आली आहे. हे नियुक्त कर्मचारी कार्यालयीन वेळेत पूर्ण दिवस जिंतूर येथील कार्यालयात हजर राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील. शासकीय सुट्टीचे दिवस वगळता हे कामकाज नियमितपणे सुरू राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना नेमक्या कोणत्या दिवशी कोणता कर्मचारी उपलब्ध असेल, याची स्पष्ट माहिती मिळणार आहे.
तालुका कृषी अधिकारी एन.जी. घुगे यांनी या आदेशात स्पष्ट केले आहे की, जर नियुक्त कर्मचाऱ्याने या आदेशाचे उल्लंघन केले किंवा कामात दुर्लक्ष केले, तर त्याला जबाबदार धरून संबंधित कर्मचाऱ्यावर कडक प्रशासकीय कारवाई केली जाईल. या नवीन व्यवस्थेमुळे जिंतूर तालुक्यातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांच्या कृषी विषयक तक्रारींचे निवारण जलद गतीने होण्यास मदत होणार आहे.
कृषी कार्यालयाने शेतकऱ्यासाठी. उचललेल्या या गतिमान पावलासाठी सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
चौकट
“शेतकऱ्यांचे हित हेच आमचे मुख्य ध्येय आहे. तालुक्यातील एकही गरजू शेतकरी योजनांपासून वंचित राहू नये यासाठी आमची संपूर्ण टीम मुख्यालयात राहून आणि फिल्डवर जाऊन काम करत आहे.” – तालुका कृषी अधिकारी, जिंतूर.




